पीएमसी केअर २.०

पुणे महानगरपालिकेमध्ये सध्या कार्यान्वित असलेल्या तक्रार आणि सूचना करण्यासाठी आणि विविध सेवा वापरण्यासाठी पीएमसी  केअर प्रकल्पाची ही पुढील आवृत्ती आहे. या आवृत्तीमध्ये https://www.pmccare.in/  या संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक सहज, सुलभ, सोप्या पद्धतीने तक्रार किंवा सूचना करण्याची तसेच विविध सेवा प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या संकेतस्थळावर लॉग-इन करून नागरिक सेवा-सुविधांबद्दल मत नोंदवू शकतात, खुलेपणाने चर्चा करू शकतात, नविन्यपूर्ण कल्पना सुचवू शकतात तसेच वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाची माहिती देऊ शकतात, इतरांना सहभागासाठी आवाहन करू शकतात आणि वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. तसेच कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मिळकत कर आणि पाणी बिल भरण्याची तसेच पुणे महानगरपालिकेच्या सर्व ऑनलाईन सुविधा वापरण्याची सुविधाही या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, झोन दाखला प्राप्त करण्याची सुविधाही या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पुणे महानगरपालिकेच्या घरपोच सेवा वापरण्यासाठी या संकेतस्थळावरून नागरिक त्यांच्या सोयीनुसार प्रतिनिधीची वेळ निश्चित करू शकतात. वेळ निश्चित केल्यानंतर पुणे महानगरपालिकेचा प्रतिनिधी घरपोच कर संकलन करण्यासाठी येऊ शकतो. या सेवेसाठी केवळ ८७ रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येते. 

याच संकेतस्थळाद्वारे नागरिक त्यांच्या जवळची ठिकाणे जसे की, सार्वजनिक शौचालये, शासकीय कार्यालये, वारसा स्थळे, रक्तपेढी, कचरापेट्या आदी ३२ प्रकारची ठिकाणे शोधू शकतात.