विभागप्रमुखाचे मनोगत

 

संविधानातील 74 व्या दुरुस्तीमुळे महानगरपालिकेच्या कर्तव्यांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत. या दुरुस्तीनंतर सामाजिक, आर्थिक आणि गरिबी निर्मुलन उपक्रमांची अंमलबजावणीचा महापालिकेच्या प्रमुख व अविभाज्य कर्तव्यांमध्ये समावेश झाला आहे. 
पुणे महानगरपालिकेचा समाज विकास विभाग मागासवर्गीय कल्याण योजना, महिला व बाल कल्याण योजना, युवा कल्याण योजना, अपंग कल्याण योजना, केंद्र सरकारची दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण जीवनमान मिशन), अपंगांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणारी डॉ. बाबा आमटे योजना, जेष्ठ नागरिक आणि विधवांना प्राथमिक आरोग्य सुविधांसाठी मासिक आर्थिक सहाय्य पुरविणाऱ्या अनुक्रमे माता जिजाऊ स्वावलंबी जीवन योजना (महिला), शरद स्वावलंबी जीवन योजना (पुरुष) आणि माता रमाई भीमराव आंबेडकर योजना (विधवा) यासारख्या विविध योजना यशस्वीपणे राबवित आहे. 
पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाने संविधानातील 73 व 74 व्या घटनादुरुस्तीच्या संकल्पनेला अनुसरुन "लाभार्थी-केंद्रित" दृष्टिकोन स्वीकारला आहे. याशिवाय, केंद्र सरकारने सुनिश्चित केलेल्या धोरणानुसारच या कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत.

या योजनांची प्रमुख वैशिष्ट्ये खाली नमूद करण्यात आली आहेत- 

  • स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणे 
  • प्रत्येक व्यक्तीमध्ये योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करण्यासाठी स्वातंत्र्य आणि स्वावलंबनास प्रोत्साहन देणे
  • केंद्र सरकारच्या दारिद्र्य निर्मूलन धोरणाला अनुसरुन या सर्व योजनांची अंमलबजावणी केली जाते. 
  • केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांना महानगरपालिकेच्या योजना आणि उपक्रमांसोबत जोडल्यास समाजातील सर्व विभागांना फायदा होतो.
  • पुणे महानगरपालिकेच्या अधिकारक्षेत्रातील संपूर्ण शहराला लाभ देण्यासाठी योजनांची अंमलबजावणी
  • समाजातील गरीब आणि दुर्बल लाभार्थी घटकांना प्राधान्य दिले जाते. 
  • व्यावसायिक प्रशिक्षण आणि रोजगारनिर्मितीसाठी 'द लाइटहाऊस', 'सिटी लाइव्हलीहूड सेंटर' आणि 'सर्व्हिस सेंटर', बचतगटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्माईल’सारखे विविध उपक्रम चालविले जातात. 
  • समाजातील गरीबांना केवळ आर्थिक मदत देण्यापेक्षा त्यांचे सक्षमीकरण्याच्यादृष्टीने विविध योजना राबविल्या जातात. 
  • खरोखर गरज असणाऱ्या सर्व लाभार्थींपर्यंत पोचणे हे आमचे ध्येय आहे. आम्ही हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली असून त्यासाठी लाभार्थीच्या समूहांचे नेटवर्क तयार केले जात आहे. सामुहिक प्रगतीला चालना देण्याचा हेतू त्यामागे आहे. 

भविष्यात समाजाच्या सक्षमीकरणासाठी विभागाची कर्तव्ये योग्य क्षमता आणि जबाबदारीने पार पाडण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. 

 

संजय रांजणे 
मुख्य समाज विकास अधिकारी
समाज विकास विभाग
पुणे महानगरपालिका