एंटरप्राईज जीआयएस

पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांकडे शहरासंदर्भातील प्रत्येक बाबींची माहिती उपलब्ध होत असते. या माहितीचे नवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने सूत्रबद्ध संकलन करून प्राप्त माहितीचा शहराचे शाश्वत नियोजन, व्यवस्थापन आणि विकासासाठी उपयोग व्हावा म्हणून एंटरप्राईज जीआयएस प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत https://gis.pmc.gov.in/  या संकेतस्थळावर पुणे महानगरपालिकेने शहराचा नकाशा (Base Map)  तयार केला आहे. या नकाशाद्वारे शहरातील विविध ठिकाणे आणि सेवा मिळून १५० पेक्षा अधिक प्रकारची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  त्यामध्ये शहरातील वाय-फाय लोकेशन्स रस्ते, मिळकती, सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिनची ठिकाणे, नागरी सुविधा केंद्र, सिग्नल, जलवाहिनी, उद्याने, रुग्णालये, सांस्कृतिक केंद्र,  सार्वजनिक शौचालये अशा उपयुक्त घटकांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. विविध विकासकामे करताना किंवा शहराच्या पायाभूत सुविधांच्या संरचनेत बदल करताना त्याबाबतची नोंद या नकाशावर करण्यात येणार आहे. 

या अद्ययावत माहितीचा विकास कामांच्या निर्णय प्रक्रियेत बहुमोल उपयोग होणार आहे. ही माहिती नकाशावर वेगवेगळ्या चिन्हांनी दर्शविण्यात आली आहे.  नागरिकांनाही निवडक प्रकारची माहिती खुली आहे. या संकेतस्थळाद्वारे मिळकत कर भरणा करण्याची सुविधा आहे. नागरिकांना त्यांच्या परिसराचा सर्व्हे नंबर जाणून घेता येणार आहे. तसेच नवीन पाणी आणि ड्रेनेज जोडणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. नव्या जोडणीसाठी आवश्यक ते शुल्क नागरिक विविध प्रकारच्या डिजीटल माध्यमातून किंवा क्षेत्रिय कार्यालय किंवा नागरी सुविधा केंद्रात रोख भरू शकतात. या प्रकल्पामुळे पुणे महानगरपालिकेमधील विभागांमध्ये योग्य समन्वय, विकासकामांमध्ये अधिक पारदर्शकता आणि गतिमानता निर्माण होणार आहे.