शहरातील राडारोडा निर्मूलनाकरिता स्वतंत्र यंत्रणेबाबत

शहरातील राडारोडा निर्मूलनाकरिता स्वतंत्र यंत्रणेबाबत

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील विविध ठिकाणची बांधकामे, बांधकामे दुरुस्ती, विविध प्रकारच्या खोदाई कामांमुळे शहराच्या विविध भागात राडारोडा मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो.

निर्माण झालेला राडारोडा विविध ठिकाणी भराव व अन्य कामाकरिता वापरला जाऊन निर्मूलन करण्यात येत आहे. तथापि काहीवेळा अशा प्रकारचा राडारोडा कुठे टाकावा याकरिता पर्याय नसल्यामुळे नागरिक, व्यावसायिक यांच्याकडून ओढे, नाले, नदीकिनार, मोकळ्या जागांवर टाकला जातो. यावर पुणें महानगरपालिकेच्या वतीने वेळोवेळी कारवाई होते.

वरीलप्रमाणे आता शहरातील राडारोडा योग्यरित्या निर्मूलन करण्याकरिता पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे वतीने पर्याय उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 अंतर्गत शहरातील राडारोडा निर्मूलन करणेकरिता आवश्यक उपाय योजना करण्यात आलेल्या असून त्यानुसार कार्यवाही करण्यात येत असल्याचे सहमहापालिका आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी कळविलेले आहे.

पुणे शहरामध्ये पुणे महानगरपालिकेकडील विविध विभाग, एमएलजीएल, टेलिफोन कंपन्या, खाजगी विकसक इ. मार्फत बांधकाम-पाडकाम करत असताना मोठ्या प्रमाणावर बांधकाम-पाडकाम राडारोडा निर्माण होतो. सदर बांधकाम राडारोडा गोळा करुन वाहतूक करण्याबाबत स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाने नियोजन केले आहे. याकरिता राडारोडा वाहतुक करणे, राडारोड्यावर प्रक्रिया करणे, शहरात निश्चित केलेल्या ठिकाणापासून अथवा कामाच्या जागेपासून राडारोडा वाहतूक करणे व प्रक्रिया करणे या बाबींचा समावेश आहे. शहरातून संकलित होणारा राडारोडा आवश्यकतेनुसार भूभरावाकरिता तसेच खाणीचा भाग समतल करण्याकरिता उपयोगात आणण्यात येणार आहे.

पुणे मनपा हद्दीतून राडारोडा संकलन करुन वाहतुकीकरिता र.रु. 19/- प्रती मे. टन/प्रती कि.मी. हा दर निश्चित केलेला असून जी.पी.एस. यंत्रणेद्वारे अंतराचे मोजमाप केले जाणार आहे. खात्याकडून याबाबत स्वतंत्र टोल फ्री सेल फोन क्र. 18002339595 हा उपलब्ध केला असून याबाबत मनपाकडील कार्यालये तसेच नागरिकही राडारोडा उचलण्याबाबत माहिती नोंदवू शकतात. त्यानुसार पुणे महापालिकेकडील विविध विभाग, एमएलजीएल, टेलिफोन कंपन्या, खाजगी विकसक यांचेमार्फत निर्माण होणारा राडारोडा सर्व संबंधित विकसकांचे मार्फत उचलून त्यांना निर्देशित केलेल्या विशिष्ट ठिकाणावर जमा करावयाचे नियोजन असून सदर राडारोडा शहरातील नदीपात्राच्या कडेने, नाल्याच्या कडेने अथवा रस्ता, महामार्गाच्या कडेने टाकला जाणार नाही याची दक्षता संबंधित विभाग घेणार असून सदरचा संपूर्ण बांधकाम राडारोडा प्रकल्पापर्यंत वाहतूक करुन त्यावर प्रक्रिया करणार आहे.

15 क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत निर्माण होणार्या बांधकाम राडारोडाच्या विल्हेवाटीसाठी क्षेत्रिय कार्यालयाने मध्यवर्ती कार्यालय घनकचरा विभागाशी समन्वय साधून पुढील कार्यवाही करणार आहे.

15 क्षेत्रिय कार्यालयांनी त्यांचे कार्यक्षेत्रात निर्माण होणारा दैनंदिन बांधकाम राडारोडा टाकणेसाठी क्षेत्रिय कार्यालयाने पुणे मनपाच्या ताब्यातील जागा निश्चित करुन त्या ठिकाणी राडारोडा संकलन केंद्र तयार करुन त्या ठिकाणचे व्यवस्थापन पहावयाचे असून यामध्ये नोंदी ठेवणे व विल्हेवाटी संदर्भात कार्यवाही करणार आहे.

पुणे मनपाच्या विविध खात्यांमार्फत निर्माण होणारा किरकोळ स्वरुपातील (10 घन मी. पेक्षा कमी) राडारोडा संबंधित क्षेत्रिय कार्यालयाच्या संकलन केंद्रावर जमा करण्यात येईल.

क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यकक्षेतील छोट्या प्रमाणातील राडारोडा व वाढीव बांधकाम/इमारतीमधील अंतर्गत फेरबदल यामुळे निर्माण होणारा राडारोडा क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत संकलन केंद्र येथे जमा करण्यात येईल.

मोठ्या प्रमाणातील राडारोडा संबंधित विकसक यांनी मनपाने निश्चित केलेल्या पुर्नप्रक्रिया प्रकल्पावर हस्तांतरित केल्यानंतर सदर ठिकाणाचे अधिकृत अधिकारी/कर्मचारी संबंधितास सही शिक्क्यासह चलन देतील. चलनामध्ये दिनांक, गाडी क्रमांक, मोकळ्या गाडीचे व भरलेल्या गाडीचे वजन, राडारोडा निर्मिती, ठिकाणाचा स.नं./विकसकाचे नाव इ. माहिती असणे अनिवार्य आहे. विकसकाने अशी अधिकृत चलने सादर केल्यानंतर संबंधितांस प्रकल्प पूर्णत्वाचा दाखला देतेवेळी त्यापोटीच्या रकमेचा परतावा अथवा भरणा करावा लागेल. तत्पूर्वी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून उपरोक्त चलनाबाबत खातरजमा करुन घ्यावी. पुर्नप्रक्रिया केंद्रावर जमा करण्याबाबतची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येईल.

सध्यस्थितीत शहरातील विविध भागात अनधिकृतपणे जमा झालेल्या राडारोडाबाबत टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून विल्हेवाटीबाबत कार्यवाही करावी व त्याचा अहवाल घनकचरा विभागास लेखी स्वरुपात छायाचित्रासह कळवावा असे आदेश महापालिका आयुक्त मा. सौरभ राव यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.