शनिवारवाडा

पुण्यातील सुप्रसिद्ध शनिवारवाडा हा अठराव्या शतकापासून मराठा राज्यकर्ते पेशव्यांचा राजवाडा म्हणून ओळखला जातो. वास्तूचे बांधकाम शनिवारी सुरु झाल्याने त्याला शनिवारवाडा असे नाव पडले आहे. पहिला बाजीराव पेशव्यांच्या राज्यात इ.स. 10 जानेवारी, 1730 रोजी वास्तूची पायाभरणी झाली व त्यानंतर इ.स. 1732 मध्ये वास्तूचे बांधकाम पूर्ण झाले. सुमारे 625 एकर परिसरात पसरलेली वास्तू प्रामुख्याने पेशव्यांचे निवासस्थान होते. अत्यंत मजबूत अशी रचना असणार्‍या या वास्तूला  पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत. शनिवारवाड्याचे उत्तरेकडे तोंड असलेले २१ फूट उंचीचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा म्हणून ओळखला जातो. शनिवारवाड्याचे प्रत्यक्षात बांधकाम सुरु झाल्यानंतर वास्तूच्या मूळ आराखड्यात अनेक बदल करण्यात आले. अखेर, भोवताली चार मोठे आणि अनेक छोटे छोटे कारंजे असणारी शनिवारवाड्याची सात मजली इमारत दिमाखात उभी राहिली.

पुणे शहराच्या मध्यवर्ती परिसरात शनिवारवाड्यात इमारत उभी असून, वास्तूच्या अंगणात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वास्तूच्या अंगणात पहिले बाजीराव पेशवे यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. वास्तूच्या परिसरात ‘वारसा’ नावाचे छोटेसे दुकान आहे जेथे हाताने तयार केलेल्या पारंपरिक वस्तू, पुस्तके आणि स्मृतीचिन्हांची विक्री केली जाते. पुणे महानगरपालिकेने शनिवारवाड्याच्या अंगणात ध्वनी आणि प्रकाशाचा मिलाफ असणारा अनोखा प्रयोग सुरु केला आहे.  मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये असणार्‍या कार्यक्रमाचे रोज दोन प्रयोग पार पडतात. संध्याकाळी 7.15 ते 8.10 दरम्यान चालणारा पहिला प्रयोग मराठी भाषेत असतो तर 8.15 ते 9.10 दरम्यान चालणारा दुसरा प्रयोग इंग्रजी भाषेतील असतो. संध्याकाळी साडेसहापासून कार्यक्रमाची तिकीटे मिळायला सुरुवात होते.